ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य आणि इच्छापत्र व मालमत्ता संरक्षण'

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार),सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) मुंबई, प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC) मुंबई एवम् नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था,मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ,नूतन महिला मंडळ,म्युझिक अँड ड्रामा सर्कल या नवी मुंबईच्या सामाजिक संस्थांद्वारा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक संमेलन साहित्य मंदिर,वाशी,नवी मुंबई येथे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाले.भारतात ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला जेष्ठ नागरिक मानले जाते.राष्ट्रीय लोकसेवा आयोगानुसार अंदाजे १४ ते २० कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत.ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांचा वृध्दापकाळ चांगल्या त-हेने घालविता यावा,त्यांचे जीवन सुसह्य व्हावे,शारीरिक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे.वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता,कामाचा हक्क,शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत कशी मिळवावी यासाठी अभ्यासपूर्ण विश्लेषणासह दोन सत्रांचे आयोजन CSSC आणि RRTC सेंटर,मुंबईतर्फे साहित्य मंदिरात करण्यात आले होते.पहिले सत्र होते ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य आणि इच्छापत्र व मालमत्ता संरक्षण यावर संमेलनाच्या प्रमुख व्यक्त्या एडवोकेट निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांनी प्रभावी व मुद्देसूद भाषणातून नागरिकांच्या समस्यांचा लेखाजोखाच मांडला.लिविंग विल व आर्थिक विल याची सांगड किती विचारपूर्वक करावी हे अनेकानेक उदाहरणांनी त्यांनी समजून दिले. दुसरे सत्र जेष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य यावर होते. ठाणे येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयातील ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी त्यांच्या प्रभावी वक्तृत्वातून ज्येष्ठांचे या संदर्भातील विकारावर त्यांच्या अनुभवातून प्रकाश पाडला.भावना,विचार व वर्तन या तीन गोष्टींचा मानवी मनावर पडलेला व पाडून घेतलेला प्रभाव कसा टाळता येईल याविषयीच्या त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाला ज्येष्ठांनी मनापासून दाद दिली.दोन्ही सत्रांमध्ये प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही दोन्ही व्यक्त्यांनी समायोजित उत्तरे दिली.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाल्यावर श्रीमती दक्षताताई व स्वर्ण कुमारी मोपन्ना या मायलेकींनी गणेश वंदना व भक्ती गीताने साहित्य मंदिर सभागृह भक्तीमय करुन टाकले. CSSC व RRTC सेंटरतर्फे वाशीतील सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.शाल, सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सर्वश्री सुनील छाजेड,विजय केदारे  सुश्री लता कोठावळे,गायत्री साटम  अमरजा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.वाशीतील लोकप्रिय समाजसेविका श्रीमती वृषालीताई मगदूम यांना वर्धा येथे डॉ.भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही एडवोकेट प्रभावळकर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.एका शायराने वृद्धत्वाची व्याख्या छान केली होती. मी पान वाळलेले,पाण्यात वाहणारे  उडताही येत नाही,बुडताही येत नाही  पण आमच्या दृष्टीने ही फक्त वाळलेली पानं नसून अनुभवांची राने असतात.खरंतर प्रत्येक दिवसाला श्रेष्ठ करण्याचं काम जेष्टच करु शकतात.हा आमचा दृढविश्वास आहे कारण घेत असलेला प्रत्येक श्वास वृद्धत्वाला सामाजिक,सांस्कृतिक दृष्ट्या तरुण करत असतो.श्रीमती अलका वढावकर व त्यांच्या सखी चमूने बॉम्बे मेरी जान हा संगीत नृत्यमय मनोरंजक असा मुंबई जीवनाच्या वैशिष्ट्यावर आधारित कार्यक्रम सादर करुन रसिकांची मने सर्वाथाने जिंकली.सभागृहाने उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात त्याला दुजोरा दिला.नवी मुंबईतील जेष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचा प्रश्नोत्तरातील सहभाग हा कार्यक्रमाची सर्वांगीण उपयुक्तता अधोरेखित करता झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप जांभळे यांनी केले.साहित्य मंदिराचे अध्यक्ष श्री.सुभाष कुळकर्णी यांनी दोन्ही आदरणीय वक्ते व कलाकारांचा क्षणचित्रे देऊन सत्कार केला व यथोचित आभार मानले.ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या समस्यांचे काही प्रमाणात समर्थन झाल्याचे समाधान ज्येष्ठांनी व्यक्त केले.सामूहिक भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 

दिलीप जांभळे
९८६९३८०६५७